रेस टू झिरो आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबादचा सहभाग; पर्यावरणपूरक वाहनांवर भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महापालिका सहभागी झाली आहे. हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. ही मोहीम नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या अंगाने प्रत्येक क्षेत्रात नियोजन करून टप्प्याटप्प्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. डिसेंबर 2015 मध्ये पॅरिस कराराचा भाग म्हणून जवळपास 200 देशांनी हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याचे वचन दिले आहे. जेणेकरून वैश्विक तापमानात होणारी वाढ ही 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादित राहू शकेल. त्यामुळे तापमानवाढ 1.5 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहील. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जगातील अनेक शहरांनी त्यांचे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन नेट-शून्यापर्यंत कमी करण्याचा संकल्प केला आहे.

शक्य तितक्या विजेवर चालवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचे रूपांतर, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्योगांना पवन ऊर्जा, जलविद्युत, सौर उर्जा आणि भू-औष्णिक प्रकल्पांवर चालू करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित केले जाईल. मात्र विशिष्ट क्षेत्रांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविले जाऊ शकत नाही, उदाहरणार्थ जड वाहने विद्युत उर्जेवर चालवू शकत नाहीत.  या कार्बन उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी शहरांनी सीओ-2 शोषण्यासाठी झाडे लावावीत. जेणेकरून एकूण कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन शून्य राहील.  राज्याचे पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पृथ्वी दिनाच्या दिवशी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद ही शहरे या रेस टू झिरो मोहिमेमध्ये सहभागी होतील, असे जाहीर केले. या मोहिमेत औरंगाबाद पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची मोठी भूमिका राहणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत विशेष हवामान बदल व जागतिक तापमान वाढ विभाग सुरू असून स्मार्ट सिटीच्या या विभागांच्या वतीने या मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

उद्दिष्ट पूर्तीसाठी पर्यावरणपूरक निर्णय

निव्वळ शुन्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या मोहिमेविषयी प्रशासक पांडेय यांनी सांगितले की, या मोहिमेतील उद्दीष्टपूर्तीसाठी शहराला पर्यावरणपूरक निर्णय घ्यावे लागतील. आम्ही निव्वळ शून्य लक्ष्याकडे पाऊल टाकण्यास सुरवात केली आहे. त्यादृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, खाम नदी पुनरुज्जीवन व शहरातील सायकलिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पाऊले टाकले आहेत. मात्र अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. 2050 पर्यंत कार्बन कमी करणार 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या शहरांद्वारे जागतिक मोहीम रेस टू झिरो म्हणून ओळखली जाते. या मोहिमेचे उद्दीष्ट या वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार्‍या ग्लासगो येथे युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, सीओपी-26 च्या अगोदर डेकारबोनाइज्ड अर्थव्यवस्थेकडे गती निर्माण करणे हे आहे.

Leave a Comment