कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा; RTO परीक्षेत अवधुत कुंभार राज्यात 16 वा

कराड प्रतिनिधी | संकेत आवळकर

काले येथील अवधूत विश्वनाथ कुंभार याने पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक मोटार निरीक्षकपदी (RTO) बाजी मारली आहे. खुल्या प्रवर्गातून अवधूत याने राज्यात 16 वा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाने काले गावच्या नावलाैकिक वाढला आहे. अवधूतच्या या यशामुळे त्यांचा अभिनंदन करत सत्कारही करण्यात येत आहे.

कराड तालुक्यातील काले येथील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ कुंभार व बेंदमळा (काले) येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सुनिता विश्वनाथ कुंभार यांचा चिरंजीव हा अवधूत आहे. अवधूत याचे प्राथमिक शिक्षण काले येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक विद्यालय महात्मा गांधी विद्यालयात झाले. तर पुण्यातील भारती विद्यापीठ मॅकेनिकल येथे डिप्लोमाचे शिक्षण घेतले, त्यानंतर खासगी आयटीआय कंपनीत दोन वर्षे काम केले. परंतु कोरोना काळात सहाय्यक मोटार निरीक्षक पदाची जाहीरात निघाल्याने नोकरी सोडून अवधूतने गावाकडे येवून स्वतः अभ्यास केला. सन 2020 मध्ये पूर्वपरीक्षा तर 2021 नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा दिली होती, त्यामध्ये अवधूतने यश मिळविले.

अवधूत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रात 16 वा क्रमांक पटकावला आहे. घरातूनच शैक्षणिक वारसा लाभलेल्या अवधूतने जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम घेतले. अवधूतच्या या निवडीमुळे काले परिसराबरोबरच कराड तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे. या यशात त्याला आपल्या कुटुंबाबरोबर नातेवाईक व मित्र परिवारांचे मोठे योगदान लाभले. त्याच्या या यशाबद्दल कराड तालुका शिक्षक संघ, महात्मा गांधी विद्यालय माजी विद्यार्थी तसेच काले ग्रामस्थ यांच्या वतीने अवधूतचा सन्मान करण्यात आला.