हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मंगळवारी जोरदार राडा झाल्याचा पाहिला मिळाला आहे. विद्यापीठाच्या फलकांवर असलेल्या बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या नावावर अभाविप अशी अक्षरे लिहण्यात आली होती. ज्यामुळे आंबेडकरवादी तरुणांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर आज अभाविपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विद्यापीठ बंदची हाक पुकारण्यात आली आहे. तसेच, या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी आंबेडकरी संघटनांनी केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसराची कोट्यावधी रुपये खर्च करून रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु, याचं परिसराच्या भिंतींवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शंभरहून अधिक ठिकाणी Join ABVP, ABVP असे लिहिले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा नामोल्लेख असलेल्या संशोधन केंद्रांच्या फलकांवर अभाविप अशी अक्षरे लिहून विटंबना केली. अभाविप कार्यकर्त्यांकडून ही विद्रूपीकरणाची मोहिम खुलेआम करण्यात आली. यावेळी त्यांना कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्य म्हणजे, या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
यावरूनच मंगळवारी घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत आंबेडकरवादी तरुणांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. त्यामुळे सध्या विद्यापीठामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर, हे कृत्य करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज विद्यापीठ बंदची हाक पुकारण्यात आली आहे. त्याचबरोबर, विद्यापीठ परिसराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांकडून च नुकसान भरपाई करून घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केली आहे. दरम्यान, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात घडलेल्या या सर्व प्रकारावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे. तसेच, अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीने देखील जोर धरला आहे.