हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना आज अचानक बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला. डॉक्टरांची टीम तातडीने उपोषणस्थळी दाखल झाली, मात्र बच्चू कडू यांनी कोणताही उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जोपर्यन्त मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी कोणतेही उपचार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांचा रक्तदाब (Blood Pressure) सध्या १८० ते ११० असा आहे. त्यामुळे कमीत कमी तुम्ही बीपीची गोळी तरी घ्या अशी विनंती आम्ही बच्चू कडू याना केली आहे, मात्र त्यांनी गोळी घेण्यास नकार दिला आहे. रुटीन प्रमाणे बच्चू कडू यांचं चेकअप सुरु आहे, थोड्या वेळानी आम्ही पुन्हा एकदा त्यांची तपासणी करणार आहोत असं डॉक्टरांनी सांगितलं. बच्चू कडू यांच्या वजनाबाबत सुद्धा डॉक्टरांनी अपडेट्स दिले, रात्री बच्चू कडू यांचं वजन ८७ किलो होते, आज ते ८५ किलोपर्यंत झाल आहे. म्हणजे २ किलो वजन कमी झालं आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी काळ मोझरी येथील उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू याना जाहीर पाठिंबा दिला, कराळे मास्टर आज आले होते, त्यांनीही आपण बच्चूभाऊंसोबत असल्याचं सांगितलं. आझाद समाज पार्टीने बच्चू कडू याना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. याशिवाय, खासदार निलेश लंके, स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राजू शेट्ट, संभाजीराजे छत्रपती, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख, रविकांत तुपकर, सचिन ढवळे, विठ्ठल कांगणे आदी मान्यवर बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी उद्या आणि परवा भेटी देणार आहेत.