हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्योत आज मालवली. तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. श्रीगुरु तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा पाच दशके प्रचार व प्रसार केला. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले
तसेच, त्यातून विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादीत न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.