कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेबांची माघार; काँग्रेसला मोठा दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून बंडखोरी केलेले उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मंगळवारी त्यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेस कडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज बाळासाहेब दाभेकर यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाविकास आघाडीमध्ये कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असून पक्षाने रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मोठं शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी त्यांनी अर्ज भरला होता. गेल्या ४० वर्षांपासून ते काँग्रेसचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे बाळासाहेब दाभेकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरु होते. अखेर काँग्रेसच्या शिष्ठाईला यश आलं असून बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

दरम्यान, कसबा पेठ साठी भाजपकडून हेमंत रासने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्याची उमेदवारी टिळक कुटुंबाबाहेर गेल्याने पक्षात नाराजीची चर्चा सुरु असल्याच्या बातम्या पसरत होत्या. मात्र कोणीही नाराज नाही असे भाजपने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कसब्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने यांच्यात थेट सामना रंगणार आहे.