RSS च्या स्वयंसेवकांनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये; पालकमंत्री पाटीलांचा नाव न घेता संघावर निशाणा

कराड : शासकिय रुग्णालयात लसीकरण मोहिमेवेळी गणवेश परिधान करुन सेवा बजावणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर युवक काँग्रेसने 10 मे रोजी आक्षेप घेतला होता. तसेच रा.स्व.से. च्या स्वयंसेवकांकडून गणवेश परिधान करुन पोलिटीकल अजेंडा राबवण्याचे काम केले जात आहे असा आरोप केला होता. आता यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही उडी घेतली आहे. शासकिय रुग्णालयात कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी गणवेश परिधान करुन येण्याची गरज नाही असं विधान पाटील यांनी केले आहे.

तसेच पुन्हा असा प्रकार घडून नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांनाही पालकमंत्र्यांनी सक्त सुचना दिल्या आहेत. एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री पाटील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आले असता त्यांनी याबाबत टिपण्णी केली.

https://fb.watch/5vn19hiadN/

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मंडळींनी 10 मे रोजी शहरातील वेणुताई चव्हाण शासकिय उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर गणवेशासह हजेरी लावली होती. यावेळी सेवा बजावताना विशिष्ट नागरिकांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून येताच युवक काँग्रेसने घटनास्थळी भेट दिली. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत वैद्यकिय अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारला. यानंतर सदर उपस्थित स्वयंसेवकांनी तेथून पळ काढला. आता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही यावादादत उडी घेतली असून रा.स्व. सं. चे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आता या विषयाचे कोणी राजकीय भांडवल तर करीत नाही ना? समाजाने या विषयाकडे राजकारण म्हणून पाहू नये. संघटना राजकीय अजेंडा राबवत असे आरोप करणे चुकीचे आहे असे संघाचे जोशी यांनी सांगितले.

You might also like