Thursday, February 2, 2023

केळीचे भाव घसरले; शेतकऱ्याने दोन एकर बाग केली भूईसपाट

- Advertisement -

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेती चे अर्थकारण बिघडत चालले असून उत्पादित मालाला भाव नाही , त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने ,परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असणाऱ्या व काढणीस आलेल्या केळी पिकावर ट्रॅक्टर फिरवत हे पिक भूईसपाट केले आहे.

- Advertisement -

पाथरी तालुक्यातील कासापुरी गाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मागील अनेक वर्षापासून केळी पिकाची लागवड केली जाते. या भागातील केळीला व्यापारी वर्गाकडून ही चांगली मागणी असते. यातून चांगला अर्थकारण होत असल्याने येथील बळीराजा या पिकाकडे वळला आहे. दुष्काळी परिस्थिती सोडली तर त्यामध्ये हे पीक घेण्यात या गावातील शिवारात खंड पडला नाही. मागच्या वर्षीही अत्यल्प पाण्यावर साधारण तीनशे एकर क्षेत्रावर या शिवारामध्ये केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यातील मागील जून महिन्यांमध्ये लागवड केलेली केळी आता काढणीस आली आहे. साधारणता एका झाडापासून दोनशे रुपयापर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित होते. तर क्विंटलला एक हजार ते बाराशे रुपये एवढा दर मिळणे अपेक्षित होता. परंतु घडले उलटेच लॉकडाऊन च्या काळात तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना केळीचे घड काढून बांधावर आणण्यास लागणारी मजुरी परवडत नसल्याने शेतकरी हतबल होऊन वैतागला आहे.

कासापुरी येथील गट क्रं ४६ मध्ये बागायती शेती करणारे जगदीश कोल्हे यांनी त्यांच्याकडील शेतीपैकी चार एकर क्षेत्रावर केळीचे पिक घेतले आहे. यात काढणीस आलेल्या दोन एकर उभ्या केळी पिकावर शुक्रवारी त्यांनी ट्रॅक्टर चालवला आहे. तीनशे रुपये क्विंटल दर त्यातून कमिशन व मजुरी खर्च वजा जाता शंभर रुपये हातावर पडत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला सल्याचे यावेळी बोलताना सांगितले. केलेला खर्च निघत नसेल तर ते पीक ठेवून काय उपयोग ?असा प्रश्नही कोल्हे यांनी यावेळी केला आहे.

येत्या खरीप हंगामामध्ये या पिकाच्या जागी सोयाबीन पिक घेण्याचे त्यांनी ठरवले आहे. जगदीश कोल्हे यांनी मागील जून महिन्यामध्ये पाच बाय पाच वर २०००केळीच्या बुडांची लागवड केली होती. त्यासाठी चार रुपये प्रति झाड एवढ्या किमतीत त्यांना बियाणे विकत आणावे लागले होते. साधारणता एकरी ५०हजारांपेक्षा खर्च त्यांना केळी जोपासण्यासाठी आला आहे. त्यातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन त्यांना अपेक्षित होतं. आता मात्र केलेला खर्चही निघणार की नाही असा प्रश्न तयार झाल्याने अत्यंत कष्टाने उभ्या केलेल्या बागेला त्यांना बांधावर टाकावे लागले आहे. उर्वरित दोन एकर क्षेत्रावरील केळीचे घड परिपक्व होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी असल्याने या क्षेत्रावरील उत्पादित केलेल्या केळीला चांगला भाव मिळेल व नुकसान भरून निघेल या एका आशेवर सध्या हा शेतकरी आहे.