व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्याचे हजारो रुपये लुबाडणारा बॅंक मॅनेजर निलंबित

औरंगाबाद – कर्जमाफी कमी आल्याचे सांगून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपये खात्यात भरण्याच्या नावाखाली घेत लुबाडणूक केल्याचा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या खुलताबाद शाखेत उघडकीस आला होता. या प्रकरणी बँकेच्या जिल्हा प्रबंधकांनी व्यवस्थापक गौतमकुमार यास निलंबित केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद येथील शेतकरी शिवाजी किसन फुलारे यांचे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन २०१९-२० मध्ये पीककर्ज माफीच्या यादीत पात्र शेतकरी म्हणून नाव होते. तदनंतर शेतकरी शिवाजी किसन फुलारे यांनी खुलताबाद येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जावून शाखा व्यवस्थापक गौतमकुमार यांच्याशी कर्जमाफी संदर्भात चौकशी केली. यावेळी शाखा व्यवस्थापकांनी फुलारे यांनी तुमची कर्जमाफी २५ हजाराने कमी झालेली आहे. तुम्हालाच आणखी २५ हजार रूपये भरावे लागतील. म्हणजे तुमचे पीककर्ज पूर्ण होईल. तसेच सदरील २५ हजार रूपये पुन्हा शासनाकडून परत मिळतील, असे सांगितले. यानंतर बँक व्यवस्थापक गौतमकुमार व बँकमित्र मनोहर वाकळे यांनी शेतकरी शिवाजी फुलारे यांच्याकडून २५ हजार रूपयाची बचत खात्यातून रक्कम काढण्यासाठी विड्रॉल स्लिप भरून घेत रक्कम काढून स्वतःकडे ठेवली. काही दिवसांनी शेतकरी फुलारे यांनी शासनाकडून २५ हजार रूपये परत आले का अशी विचारणा केली असता व्यवस्थापक गौतमकुमार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच बँक खाते उतारा देण्यास ही टाळाटाळ केली.

परंतु, शेतकरी फुलारे यांनी बँक व्यवस्थापक गौतमकुमार यांच्या गैरहजेरीत बँक उतारा काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, व्यवस्थापक गौतमकुमार व बँकमित्र मनोहर वाकळे तसेच कँशियर अभय कुलकर्णी यांनी त्यांची फसवणूक केली आहे. यानंतर फुलारे यांनी याबाबतची लेखी तक्रार बँकेंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली . त्याचबरोबर आ. प्रशांत बंब यांनीही बँकेच्या वरिष्ठाकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान, बँकेंच्या वरिष्ठांनी सखोल चौकशी करून बँक व्यवस्थापक गौतमकुमार यांना निलंबित केले आहे. तर मनोहर वाकळे यांची बँकमित्र म्हणून असलेली नियुक्ती अग्रणी जिल्हा प्रबंधक दिगंबर महाडीक यांनी २४ नोव्हेंबरच्या लेखी आदेशाने रद्द केली आहे.