उंब्रजला ATM फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी : घटना CCTV मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बंगळूर महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथे असणारे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज शनिवारी (दि. 22) पहाटे 3. 30 ते 3. 45 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कटावणीने उचकटून एटीएम मधील रोकड रक्कम लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कंट्रोल विभागाने पहाटेच्या सुमारास एटीएम फोडण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानुसार रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पोहोचता आले. सायरणच्या आवाजामुळे चोरटे काळोख्या अंधारात पसार झाले आहेत. या प्रकारामुळे उंब्रजसह परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी नागठाणे येथील एसबीआय बॅंकेचे एटीएम जेलेटीनच्या काड्यांनी चोरट्यांनी उडविले होते. तर कराड तालुक्यातील गोवारे येथील बॅंक आॅफ इंडियाची शाखा आहे, तेथील एटीएम चोरट्यांनी जेलेटीनच्या काड्यांनी उडविण्याचा प्रयत्न केला होता. कराड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांना ताब्यातही घेतले होते. परंतु या सततच्या घटनांमुळे चोरटे एटीएमला आपले लक्ष्य बनवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बॅंकांनी एटीएमच्या सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे.

दिवाळीच्या सलग सुट्टीमुळे बॅंकेने एटीएम मध्ये मोठ्या प्रमाणात रोकड भरणा केला असल्याचा अंदाज चोरट्यांनी लावला असल्याने उंब्रज येथील एटीएमवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु एटीएम मॉनिटरिंग एजन्सीच्या सतर्कतेमुळे पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले असून याबाबत अधिक तपास उंब्रज पोलीस करत आहेत.