सातारच्या फरार असलेल्या गुंडाला पंजाबमध्ये अटक; भुईंज मर्डर केसमधील आरोपी बंटी जाधव अखेर गजाआड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील भुईंज येथील दोन महिन्यापासून फरार असलेला तडीपार गुंड आणि मोक्यातील प्रमुख आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव यांच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. तरूणांचे अपहरण करून खून व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणार्‍या बंटी जाधवसह निखिल शिवाजी मोरे, मयूर महादेव साळुंखे या तीन आरोपीला अटक केली आहे. तिन्ही आरोपींना पंजाब (भंटीडा) येथून अखेर एलसीबीच्या टीमने पंजाबमध्ये पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या टीमने ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जानेवारी महिन्यात भुईंज (ता, वाई) येथे फार भयानक पध्दतीने खून झाला होता. या प्रकरणात 12 आरोपी ताब्यात घेतले होते. भुईंज येथील रहिवासी असलेल्या बंटी जाधवने साथीदारांच्या मदतीने आसले (ता. वाई) गावच्या पुलाजवळ राहणार्‍या चव्हाण नामक तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केला होता. तसेच त्याच दिवशी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भुईंज स्मशानभूमीत त्याचा मृतदेह जाळून पलायन केले होते. याप्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी घेऊन सातारा एलसीबीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना बंटी जाधवला पकडण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पासूनच एलसीबीचे सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी हे राज्यासह पराज्यात बंटी जाधवच्या मागावर होती.

बंटी नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस राजस्थान, हरियाणाला पोहचले. मात्र, पोलीस मागावर असल्याची माहिती बंटीला मिळाली होती. त्यामुळे त्याने पंजाबकडे आपला मोर्चा वळवला. त्याचवेळी पंजाबमध्ये एलसीबीच्या पथकाने झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात 18 आरोपी आहेत. त्यापैकी 15 आरोपी अटक केली आहे. तर तीनजण फरार आहेत. नितिन घाडगे, चिम्या शेवाळे, रोहित कचरे हे तीघेजण फरार आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group