बारामतीच्या नादाला जेवढे लागले तेवढे संपले : आ. शशिकांत शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

बारामतीच्या जेवढे नादाला लागले तेवढे संपले. राजकारणात ताजे उदाहरण बघायचे झाले तर हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अनेक जणांनी बारामतीचा नाद केला. परंतु ज्यांनी नाद केला तेवढे संपून गेले, हा इतिहास आहे. त्याच पध्दतीने भविष्यात यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा माजी मंत्री व विधान परिषदेचे आ. शशिकांत पाटील यांनी आ. महेश शिंदे यांना दिला.

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील भुईज येथील किसनवीर साखर कारखान्याच्या निमित्ताने वाई, कोरेगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. शिवसेना आ. महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे यांच्यात या निवडणुकीमुळे जोरदार खडाजंगी दिसून येत आहे. विधानसभा निवडणुक त्यानंतर जिल्हा बॅंक निवडणूक आणि आता किसनवीर कारखान्याच्या निमित्ताने शिंदे- शिंदे दोन्ही नेते एकमेकासमोर प्रचारा दरम्यान उभे आहेत. आ. महेश शिंदे यांनी जरंडेश्वर कारखान्यावरून अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता आ. शशिकांत शिंदे यांनीही आ. महेश शिंदे यांना इशारा दिला आहे.

आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. शिंदे म्हणाले, या राज्यात आदरणीय शरद पवार आणि अजित पवार दादा यांच्यावर आरोप केल्याशिवाय राजकारणात महत्व प्राप्त होत नाही. सातारा जिल्ह्यातही रयत शिक्षण संस्था आणि जरंडेश्वर कारखान्या संदर्भात टीका करण्यात येत आहे. ज्याचा राजकीय जन्म शरद पवार यांच्या आशिर्वादामुळे झाला. त्यांनी टीका करू नये. राजकारणाची पातळी सोडून टीका करतात त्यावेळी त्यांना जागा दाखविण्याची वेळ येईल. कुणी जास्त अहमपणा दाखवू नये. शरद पवार असे नेतृत्व आहे, ज्यांना देशाचे पंतप्रधान मानसन्मान देत असतात. तेव्हा येणाऱ्या भविष्य काळात आरोप करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल.