बसवेश्‍वर संदेशयात्रा बुधवारी सांगलीत दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महात्मा बसवेश्‍वर यांच्या वचन साहित्याचा प्रचार आणि जागृतीसाठी २६ मे पासून पुण्यातून बसवेश्‍वर संदेशयात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा बुधवार दि. १२ रोजीपासून तीन दिवस सांगली जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेचे जंगी स्वागताचे नियोजन केले असल्याची माहिती स्वागतोत्सुक प्रदीप वाले व डॉ.रविंद्र आरळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

दि. २६ मेपासून पुण्यातून बसवेश्‍वर संदेश यात्रा सुरू केली आहे. यामध्ये बसवेश्‍वरांची भव्य मूर्ती, बसव वचन साहित्य आदींचा समावेश आहे. ही यात्रा १२ जूनला जतमध्ये येईल. तेथे डॉ. आरळी यांच्याहस्ते जिल्ह्यातील यात्रेचे उद्घाटन होईल. त्यानंतर जतमधून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तेथून १३ जूनला कवठेमहांकाळ येथे सकाळी ९ वाजता महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याहस्ते स्वागत होईल. तेथून तासगाव, विटा, कडेगाव मार्गे कराडला जाणार आहे. शुक्रवार दि. १४ रोजी ही यात्रा इस्लामपूर येथे येईल. तेथून आष्टामर्गे ती सांगलीत येईल. तेथे दुपारी १ वाजता मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये येईल. तेथे अध्यक्ष सुधीर सिंहासने यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, नागरिक स्वागत करतील. तेथून दुपारी ३ वाजता कुपवाड रस्त्यावरील नवमहाराष्ट्र हायस्कूल येथे पटंगणावर भव्य स्वागत व कार्यक्रम होईल. तेथून मिरजेत सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणुकीने संदेशयात्रा पोहोचेल.

तेथे भव्य कार्यक्रमानंतर अंकलीमार्गे ती कोल्हापूरला जाणार आहे. तेथे संदेशयात्रेचा समारोप होईल. यात्रेचे नेतृत्व अरविंद जप्ती करत आहेत. महात्मा बसवेश्‍वरांनी कर्मकांडाला तीलांजली देऊन जातीधर्माच्या भींती भेदत समता, महिलासन्मान असे जीवनाचे सार दिले. ते आज विश्‍ववंद्य आहे. त्या वचनसाहित्याचा प्रचार आणि प्रसारासाठी माजी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचे पुत्र अरविंद जत्ती यांनी लोकचळवळ सुरू ठेवली असल्याचे वाले यांनी सांगितले. यावेळी महादेव कुरणे, महेश्‍वर हिंगमिरे, मिलिंद साखरपे, डॉ. पंकज म्हेत्रे, मनोहर कुरणे, सचिन गाडवे, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment