बीड प्रतिनिधी | जिल्ह्यातील सोनदरा गुरुकुल येथे मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत मूल्य विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण सुरू झाले आहे. यात मुख्यतः शिक्षकांसोबत काम करणे हा प्रमुख भाग असेल. हेच प्रशिक्षित शिक्षक पुढे मुलांसाठी विविध उपक्रम राबवतील. पुण्यातील “ओवेल्स ऑफ पीपल्स असोसिएशन” (वोपा) या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण सुरु आहे.
हे प्रशिक्षण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या डोमरी या दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘सोनदरा गुरुकुलम’ या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांसाठी आहे. शालेय शिक्षकांना प्रशिक्षित करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे हा या मागील मुख्य उद्देश्य आहे. शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक हेमलता होनवाड याही या कामात महत्वाची मदत करत आहेत.
या प्रशिक्षणाविषयी बोलताना सोनदरा गुरुकुलचे संचालक सुदाम भोंडवे म्हणाले, ‘’कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हा अतिशय महत्वाचा भाग असतो परंतु बहुतांश प्रशिक्षक हे शहरी भागात काम करतात. ग्रामीण भागात येऊन काम करण्यास हे प्रशिक्षक तयार नसतात. या परिस्थितीत वोपा ही संस्था या भागात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे महत्वाचे काम करत आहे ही अतिशय समाधानकारक व आशादायी बाब आहे. या प्रशिक्षणाची इतर संस्थानादेखील गरज आहे.’’ या कामामध्ये प्रशिक्षक म्हणून प्रफुल्ल शशिकांत, अश्विन भोंडवे, आकाश भोर आणि ऋतुजा जेवे हे प्रामुख्याने सहभागी आहेत.
‘’या प्रशिक्षणातून तळागाळात काम करणारे शिक्षक आणि कार्यकर्ते प्रभावीपणे काम करण्यास तयार होत आहेत. याचा उपयोग या भागातील अनेक विद्यार्थी आणि संबंधित घटकांना होत आहे. सकारत्मक बदलाच्या दिशेने उचललेले हे पाऊल असेच पुढे वाढत राहील’’ असा विश्वास संस्थेचे एक संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी व्यक्त केला.
वोपा ही संस्था काय काम करते?
केळकर समितीच्या अहवालानुसार मराठवाडा हा महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेत मागासलेला भाग आहे. वोहेल्स ऑफ दि पीपल्स असोसिएशन (वोपा) ही संस्था या भागातील सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणाचे काम करत आहे. तसेच सामाजिक काम करू इच्छिणाऱ्या दुर्बल घटकातील तरुणांमध्ये वैचारिक स्पष्टता व संविधानिक मुल्ये यांची रुजवणूक करणे हा देखील संस्थेच्या कामाचा महत्वाचा भाग आहे.
प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य
या प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सध्या असलेल्या संस्थेच्या गरजा नेमकेपणाने शोधून त्यावर शास्त्रीय पद्धतीने काम करणे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबर प्रशिक्षणार्थी सदस्यांना चर्चांमध्ये सहभागी करून घेणे. प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन कसे असावे, मूल्यमापन पध्दती, प्रभावी पाठ नियोजन, शिकण्याच्या व शिकवण्याच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण पद्धती, कल्पकतेचे वास्तवात रुपांतर, लिंगभाव समजून घेताना, लोकशाही व संविधानिक मुल्यांचा शालेय शिक्षणाशी असलेला संबंध, बदलते जग आणि तरुणांपुढील आव्हाने, मानवी व संविधानिक मूल्यांचे महत्व इत्यादी विषयांचा समावेश आहे.