खळबळजनक ! बीडमध्ये सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. राहुल ईश्वर वाघमारे असे या आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. मृत राहुल वाघमारे हे शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळला. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा तपास सुरु केला. यादरम्यान पोलिसांना मृत राहुल वाघमारे यांच्या घरात एक सुसाइड नोटदेखील आढळली. या नोटमध्ये सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मृत राहुल वाघमारे यांनी लिहिले होते.

सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल ईश्वर वाघमारे असे या मृत शिक्षकाचे नाव आहे. बीडच्या पालवन चौक परिसरामध्ये हि घटना घडली आहे. राहुल वाघमारे हे प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्या करण्यापूर्वी राहुल वाघमारे यांनी सुसाइड नोट लिहिली असून त्यात प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि त्यांचा सहकारी मुन्ना लोंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. शिवाजी नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राध्यापकांची चौकशी
मृत शिक्षक राहुल वाघमारे यांच्या आत्महत्येप्रकरणी सहकारी प्राध्यापक बाळासाहेब लाखे यांची चौकशी सुरु आहे. मृत राहुल वाघमारे यांनी सहकारी प्राध्यापक बाळासाहेब लाखे हे मागील दोन वर्षांपासून मानसिक त्रास देत असल्याचे आपल्या सूसाईड नोटमध्ये म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.