उंदंड आयुष्याच्या मायंदाळ शुभेच्छा आबा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सकाळचे माजी समूह संपादक उत्तम कांबळे सरांनी “काळजातले आर.आर.आबा” म्हणून राज्याचे माजी गृहमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील यांच्यावर एक छोटेखानी पुस्तिका लिहिली आहे.त्यात कांबळे सर म्हणतात की सांगलीत राहण्याची सोय होतेय पण जेवणाची सोय होत नाही म्हणून मी उच्च शिक्षणाला मुकणार होतो.पण अचानक आर.आर.आबा प्राचार्य पी.बी. पाटलांच्या शांतीनिकेतनमध्ये आयुष्यात आले आणि जीवन बदललं.आज मी जो काही आहे त्यात आबांचा वाटा खूप मोठा आहे.आर.आर.आज राज्याचा गृहमंत्री आहे उद्या देशाचा गृहमंत्री असला तरी तो माझ्यासाठी आबाचं असेल.आबा हे नावचं असं आहे की सगळ्यांना सामावून घेतं,सगळ्यांची काळजी करत सगळ्यांना आपलंसं करून घेतं.

अगदी तशीच काहीशी आठवण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास लोकांची आबासाहेब नवनाथ सलगर अर्थात आम्हा सगळ्यांचे आबा यांच्या बाबतीत आहे.

पंढरपूरसारख्या दुष्काळी पट्ट्यात अजापाल समाजात जन्मलेल्या आबांना आयुष्यभर प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष अजून चालूच आहे.माझ्या जन्माच्या वेळी सटवाईने रेघाच अशी मारली आहे की आपल्याला कायम संघर्षरत राहावं लागेल असं आबा नेहमी म्हणत असतात.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आबा शिवाजी विद्यापीठातून एमएला भूगोल विषय घेऊन चांगल्या मार्कांनी पास झाले.

लाल दिव्याच्या गाडीच उदात्त स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली.पंढरपुरात नीट अभ्यास होत नाही म्हणून थेट पुण्य – नगरी गाठली.खिशात पैसा – अडका नाही आणि पुण्यात कुणी ओळखीचं देखील नाही अशा अवस्थेत आबांना मायबाप पुणे विद्यापीठाने आपलंसं करून घेतलं व मित्रांच्या गोतावळ्याने सामावून घेतलं.

कधी एका मार्काने तर कधी दोन मार्काने स्पर्धेतून आबा बाजूला पडत राहीले.पण हार मानेल तो आबा कसला ? राखेतून फिनिक्स पक्षासारखं भरारी घेण्याचं बळ पंखात आहे मग घाबरायचं कशाला ? अशा थाटात आबा निघाले आहेत.या स्पर्धेच्या जंजाळात लवकरात – लवकर आपल्याला यश मिळावं या अपेक्षेसह…

उदंड आयुष्याच्या मायंदाळ शुभेच्छा आबा ! एक शेर खास आपल्यासाठी…

जन्मदिन तो एक रस्म – ए – जहाँ हैं,जो अदा होती हैं,

वरना सूरज की कहां सालगिरह होती है !