बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही मग तो सदावर्ते असो किंवा बंडातात्या : भगवान निंबाळकर

आज गुणरत्न सदावर्तेना पोलीस करणार कोर्टात हजर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांची आज 4 दिवसांची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना दुपारच्या सत्रात कोर्टात हजर केले जाणार आहे. सदावर्ते यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणाचा तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे आहे. आज निंबाळकर यांनी जिल्ह्यात बेताल वक्तव्य करणाऱ्यांना पोलीस सोडणार नाही मग तो सदावर्ते असेल किंवा बंडातात्या कराडकर असे म्हणत इशारा दिला. तसेच सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करून देण्याची मागणी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सातारा येथील प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात बेताल वक्तव्ये केल्या प्रकरणी सर्वप्रथम सातारा पोलीसांनी कारवाई केली आहे. सदावर्ते यांनीही वेताळ वक्तव्ये केली आहेत. त्याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान सदावर्ते यांची आज चार दिवसाची पोलीस कोठडी संपणार आहे. तसेच त्यांना दुपारी दोन नंतर सातारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच अजून दहा दिसू पोलीस कोठडी शिल्लक असल्याने ती देण्याची मागणी करणार आहोत.

सातारा जिल्हा न्यायालयाने वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान आज पुन्हा सातारा पोलिसांकडून सदावर्ते यांना हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली आहे.