आयर्विन पुलावर भजनी मंडळाच्या टेम्पो आणि कारचा अपघात : दोन ठार तर 10 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | सांगलीच्या आयर्विन पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो मधील महिला आणि कार मधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. इर्शाद रफिक नदाफ (रा. कसबेडिग्रज) असे मृत चालकाचे नाव आहे. तर मृत झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही. सदरचा अपघात बुधवार दि. 4 मे रोजी रात्री 10. 30 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर पोलिसांनी आणि नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुंग येथील भजनी मंडळाचा टेम्पो (क्र. एमएच- 10 एक्यू-  5033) हा 12 जणांना घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ याठिकाणी निघाला होता. तर चालक इर्शाद नदाफ हा त्याच्या ताब्यातील मारुती वॅगन आर ( क्र. एमएच- 10 डीएल- 2886) ही कार घेऊन सांगलीतून कसबे डिग्रजकडे गावी निघाला होता. काल रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दोनही वाहने आयर्विन पुलावर आली. यातील भरधाव वेगात असलेल्या वॅगनार कारने समोरासमोर टेम्पोला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोनही वाहनांचा चक्काचूर झाला होता. या अपघातात कार चालक नदाफ याचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो मधील चालक हा गंभीर जखमी झाला असून त्याचे दोनही पाय निकामे झाले होते. तर ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या वृद्ध महिलेचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

अपघातानंतर या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि सांगलीवाडी मधील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही वाहनात अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यानंतर तातडीने जखमींना सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात टेम्पो मधील 10 जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच तुंग आणि कसबेडिग्रज मधील ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment