भवानी मंदिराचे ग्रामस्थांकडून केले जातेय सुशोभीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : वाळूज परिसरातून वाहणार्‍या खामनदीकाठी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टेकडीवर असलेल्या हेमाडपंती बांधकामातील भवानी माता मंदिराची सुशोभिकरणाकडे वाटचाल सुरू आहे. ग्रामस्थांनी परिसराला तारेचे कुंपण घातले आहेत, विविध फळे-फुलांच्या तसेच शोभेच्या रोपांची लागवड केली जात आहे.

गावाच्या पूर्वेला खामनदीकाठी विविध धार्मिक स्थळे आहेत. त्यात महादेव मंदिर, शनी मंदिर, हनुमान मंदिर, बाबाजी बुवा मंदिर, संतोषी माता मंदिर आधी देवस्थाने आहेत. शनि मंदिरासमोरील टेकडीवर भवानीमातेचे हेमाडपंती बांधकामातील मंदिर आहे. मंदिराच्या दर्शनी भागात 15 फूट उंचीचा दीपस्तंभ दिमाखात उभा आहे. तर पूर्वेकडे तोंड असलेल्या मंदिरातील एका मंदिरात महादेवाची पिंड असून, दुसऱ्या मंदिरात ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेची दगडातील कोरीव व नक्षीकाम केलेली मूर्ती आहे. मागील 30 वर्षापर्यंत ग्रामस्थांच्या वतीने गावातून मिरवणूक काढून देवाची यात्रा भरत होती.

आता भवानी माता मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मंदिर परिसराला तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. ही कामे ग्रामस्थ स्वतः करीत आहेत. वड, पिंपळ, कडूनिंब, जास्वंद, आंबा, लिंबोणी, नारळ, डिडोनी आदींच्या रोपांची लागवड करून परिसराला हिरवा शालू पांघरण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. या ठिकाणी लवकरच बोअरवेल, मंदिराच्या दर्शनी भागात सभामंडप, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसण्याची व्यवस्था, दसरा सणाला होणारी गर्दी लक्षात घेऊन रांगा लावण्यासाठी संरक्षण कठडे उभारणे, आदी कामे केली जाणार आहेत.

Leave a Comment