Sunday, June 4, 2023

घरातील भूत काढायचे सांगून भोंदू हकिमने 3 लाख लुटून महिलेवर केला अत्याचार

औरंगाबाद – डॉक्टरांकडे जाऊनही डोकेदुखी न थांबल्याने भोंदू हकिमाकडे गेलेल्या महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. शुद्धीवर आल्यावर सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर या भोंदू हकिम फरार झाला होता. औरंगाबादमधील बेगमपुरा पोलिसांनी दीड महिना शोध घेऊन 19 जानेवारीला अखेर या हकिमाला अटक केली. या भोंदू हकीमाचे नाव मुश्ताक शेख उमर शेक असून तो मूळचा नाशिक येथील रहिवासी आहे.

शहरातील बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला मागील अनेक महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास होता. शहरातील नामवंत डॉक्टरांकडे उपचार घेऊनही तिचा त्रास कमी होत नव्हता. महिलेला नातेवाईकाने मालेगावचा एक हकीम उपचार करत असल्याचे सांगितले. रहेमानिया कॉलनीत दुकान असलेल्या आरोपी मुश्ताककडे पीडिता 27 जुलै रोजी गेली. त्यानंतर हकीम पीडितेच्या घरी गेला. घरावर आत्म्याचा प्रभाव असून तीन कस्तुरी खरेदी करून त्याला घरातून काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च सांगितला.

तुमच्या घरातून आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा येईल, असे भोंदूने सांगितले. 2 ऑगस्ट 2020 रोजी पीडितेने त्याला कस्तुरीसाठी एक लाख रुपये दिले. 15 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी आणखी एक लाख रुपये दिले. तेव्हा त्याने पीडितेला खोलीत नेत आत्मा जाण्यासाठी उपचार करावे लागतील, असे सांगत इतर लोकांना घराबाहेर काढले. पीडितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार केला. पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर मात्र पीडितेला हा प्रकार समजला. सदर महिलेने 7 डिसेंबर 2021 रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, भोंदू हकीम मुश्ताक फरार झाला होता. अखेर बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, तपास अधिकारी विशाल बोडखे यांनी शोध घेत त्याला अटक केली.