‘कुटुंब नियोजनामुळेचं देशात हिंदुंच्या संख्येत घट’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह पुन्हा एकदा बरळल्या

भोपाळ । आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह बोलत होत्या. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर तोफ डागली. सोबतच कुटुंब नियोजनाबाबत जनतेला एक सल्लाही देऊन टाकला. कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्लाच अप्रत्यक्षपणे देऊन टाकला.

हिंदुंनी आपल्या मुलांचं संरक्षण करावं. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. आपण सावध झालो नाही तर आता जे धन कमवत आहात त्याचा उपयोग करण्यासाठी तुमच्या मुलांकडे काही नसेल. इतिहास सांगतो की इतिहासातून सावध राहणं शिकलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मुलांना राष्ट्रवाद शिकवा. आपल्या देशासाठी समर्पित होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा”, असा सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी हिंदुंना दिला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेते कमलनाथांवर निशाणा
मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी एका महिला भाजप उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. त्यावरुनही प्रज्ञासिंह यांनी कलमनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भारतीय असाल तर महिलांचा सन्मान करणं शिका, नाहीतर रावणाच्या पुतळ्याप्रमाणे तुमचीही अवस्था होईल, अशा इशाराच प्रज्ञासिंह यांनी कमलनाथ यांना दिला. भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल ज्यांनी आयटम हा शब्द वापरला, ते आपली आई, बायको, बहिण यांनाही याच नावाने आवाज देतात का? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी कमलनाथांना केलाय.

दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावरही प्रहार
“भोपाळची जनता धर्म आणि अधर्मात भेद करणं जाणते. लोकसभा निवडणूक ही धर्म आणि अधर्म अशीच लढली गेली आणि भोपाळच्या जनतेनं त्यांना दाखवून दिलं की अधर्मावर नेहमी धर्माचाच विजय होत असतो”, अशा शब्दात प्रज्ञासिंह यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली. तर मेहबुबा मुफ्ती यांच्या आम्ही तिरंगा उचलणार नाही या विधानावरही जोरदार हल्ला चढवला. “अब देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा”, अशा इशाराच त्यांनी मुफ्ती यांना दिला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

You might also like