शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन

दिग्गज नेत्यांची उपस्थिती : ४०० कोटींच्या खर्चातून उभे राहणार स्मारक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे मुंबई येथे आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत असून या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याने मानापमानाचे नाट्य रंगले आहे. या स्मारकासाठी बऱ्यापैकी मंजुरी मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांचा काळात झाल्याचा दावा भाजपनं केला आहे. मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कोनशीलेचा अनावरण कार्यक्रम पार पडला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३व्या जयंतीचे औचित्य साधून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्मारकासाठी जागेचा ताबा दिला. कागदपत्रांचे हस्तांतर २३ जानेवारी २०१९ रोजी औपचारिकरित्या पार पडले. पण स्मारकाच्या कामाने दोन वर्ष उलटली तरी अपेक्षित वेग घेतला नाही. ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मारक तयार करण्यासाठी ४०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. या निधीतून स्मारक तयार केले जाणार आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्मारकाच्या इमारतीचे बांधकाम होईल. यात बांधकाम, वीज यंत्रणेशी संबंधित कामं, मध्यवर्ती वातानूकुलित यंत्रणा, इमारतीच्या अंतर्बाह्य सजावटीचे काम, वाहनतळ, उद्यान, रेनवॉर हार्वेस्टिंग आदी कामं होणार आहेत. या कामांसाठी २५० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. स्मारक निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाशी संबंधित मोठी कामं होतील. यात लेझर शो, डिजिटल मॅपिंग, डिजिटल यंत्रणेच्या मदतीने स्मारकात वेगवेगळ्या टप्प्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीची माहिती देणारी ऑडिओ-व्हिडीओ यंत्रणा उभारण्यात येईल. या कामासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

You might also like