राज्य सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईत चार नवे जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाबाधितांचा दररोज वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबईत आणखी चार मोठे कोव्हिड सेंटर तयार करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. मुंबईत दररोज दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत आणखी चार जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार आहे.

संबंधित कोव्हिड सेंटर हे मे महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असं महापौरांनी सांगितलं. मुंबईत 5300 बेड तर 800 आयसीयू बेड असलेले कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहेत. हे कोव्हिड सेंटर MMRDA, CIDCO, MHADA, BMC यांच्याअंतर्गत उभारले जाणार आहेत. या कोव्हिड सेंटरमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होईल. तसेच मुंबईकरांनाही सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती महापौरांनी दिली.

मुंबईत कांजूरमार्ग येथे 2000 बेड आणि 200 आयसीयू बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे. हे कोव्हिड सेंटर MMRDA द्वारे बांधण्यात येईल. दुसरे जम्बो कोव्हिड सेंटर हे मालाड येथे CIDCO द्वारे उभारण्यात येणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्येही 2000 बेड आणि 200 आयसीयू बेड उभारले जाणार आहेत.

तसेच सोमय्या ग्राउंडवर म्हाडाच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर उभारलं जाणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 1000 बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. चौथा कोव्हिड सेंटर हा महालक्ष्मी येथे असणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 300 बेड आणि 200 आयसीयू बेड असणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईत याआधी सहा जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये आणखी चार कोव्हिड सेंटरची भर होणार आहे. त्याचा आरोग्य यंत्रणेला निश्चितच फायदा होईल.

Leave a Comment