मोठी बातमी : CBI कडून देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आता केंद्रीय अन्वेषण विभागाने आता आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआय रविवारी या दोघांचे जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती कोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे आता पालांडे सीबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर याबाबत काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

परमबीर सिंह यांच्या आरोपासंदर्भात सीबीआयकडून सुरु असलेल्या चौकशीत आता बोरिवलीतील एका बार मालकाचे नाव समोर आले आहे. एनआयएने मागील आठवड्यात गिरगाव भागात टाकलेल्या धाडीत एक डायरी सापडली होती. त्या डायरीत विविध प्रकारचे आकडे लिहिण्यात आले होते. आकड्यांसह महेश शेट्टी या व्यक्तीचे नाव आढळले. हे आकडे खंडणीचे असून शेट्टीचा त्या खंडणीशी संबंध असल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्यानुसार सीबीआयने शेट्टीबाबत तपास सुरू केला आहे.