हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित असून बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर आहेत. देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल २ लाख ६१ हजार ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४७ लाखांवर पोहोचली आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत. या तीन टप्प्यात असणारे मतदारसंघ वगळता उर्वरित पश्चिम बंगालचा समावेश देशव्यापी लॉकडाऊनमध्ये असेल, असं सूत्रांकडून समजतं. आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील मतदान पूर्ण झालं आहे. या सर्व राज्यांचे निकाल २ मे रोजी हाती येतील. मात्र तोपर्यंत थांबल्यास देशातील परिस्थिती आणखी भीषण होईल.