जयपूर । राजस्थानात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत कोट्यवधींची बेकायदा संपत्ती हाती लागली आहे. ही संपत्ती थोडीथोडकी नसून तब्बल १७०० कोटींची असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. जयपूर येथे सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागाने ही छापेमारी केली होती.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीन मोठे व्यवसायिक समूह सिल्व्हर आर्ट ग्रुप, चोरडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुप यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये १७०० ते १७५० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे उघडकीस आले आहे. यासह किमती वस्तू, मूर्ती, महागडी रत्ने, वस्तू या भूयारातून सापडल्या आहेत, असे सांगितले जात आहे.
जयपूर येथे एका सर्राफा व्यापारी यांच्याकडे हे भूयार सापडले आहे. यात तब्बल ७०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे आढळून आले आहे. आयकर विभागाची ही कारवाई ५ दिवस चालली. यामध्ये ५० पथके आणि २०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सलग पाच दिवस आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची छाननी करण्यात गुंतली होती.
तीन बड्या व्यवसायिक ग्रुपच्या कार्यालयात २०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रे सापडली असून, सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहे. आयकर विभागाची ५० जणांची तुकडी सलग पाच दिवस या उद्योग समूहांच्या ठिकाणी कारवाई करण्यात गुंतली होती, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली. आयकर विभागाकडून या सर्व वस्तू, कागदपत्रांचा विस्तृत तपास करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’