कसबा पेठ, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर; ‘या’ 2 नेत्यांना संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. कसबा पेठ साठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी होती. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. अखेर आज दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा पेठ येथे टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी गेली आहे. त्याठिकाणी हेमंत रासने हे भाजपकडून असतील. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. तर चिंचवड येथे मात्र दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी यापूर्वी भाजपचे उमेदवार होते. कसबा येथील आमदार मुक्त टिळक आणि चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा भाजपचे व्यक्त केली होती. मात्र महाविकास आघाडी दोन्ही जागा लढण्यावर ठाम आहे. त्यानुसार कसब्याची जागा काँग्रेस आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे.