‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’- राम शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न व दूध दराच्या मुद्द्यावरून राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’ हे सरकार कधीही कोसळेल, असं त्यांनी म्हटलं.

‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना राम शिंदे म्हणाले कि,” ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. ‘एका नवऱ्याच्या दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही,’ अशी घणाघाती टीका राम शिंदे यांनी यांनी केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करताना सरकार दिसत नाही. त्यांना जनतेचं, शेतकऱ्यांचं काहीही देणं-घेणं नाही आहे. हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही. गेल्या ८ महिन्यात लोकांच्या हिताचा एकही निर्णय सरकारनं घेतलेला नाही, असं सांगत शिंदे यांनी सरकारचा निषेध केला.

दरम्यान, आज राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माहीजळगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करण्यात आला. ‘दुधाचा दर कमी झालेला आहे. दुधाची खरेदी अतिशय कमी दराने होते आहे. विक्री मात्र ५० ते ६० रुपयांनी होते आहे. सरकारनं यात मध्यस्थी करण्याची गरज होती. २१ ऑगस्टला आम्ही या संदर्भात निवेदनही दिलं होतं. मात्र, त्यावर ना कुठली चर्चा झाली ना निर्णय झाला. त्यामुळं आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली आहे,’ असं शिंदे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment