व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भाजप सरचिटणीस मारहाण प्रकरणी जंजाळ विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद | सोमवारी गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. यामुळे भाजप सरचिटणीस गोविंद केंद्रे यांना मंत्री भूमरे यांच्या कार्यालयात नेऊन मारल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर भाजपकडून माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी अखेर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असताना प्रा. गोविंद केंद्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका हे या केंद्रावर गेले होते. यावेळी जंजाळ यांचे कार्यकर्ते ओळखीच्या लोकांना बेकायदेशीररित्या रांगेत उभे करत अरेरावी करत होते. यामुळे केंद्रे यांनी जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांना विरोध करत असा प्रकार करू नका असे सांगितले. तर हे आरोग्य केंद्र तुमच्या मालकीचे आहे का? तुम्ही बोलणारे कोण? असे म्हणत धमकी दिली. यानंतर राजेंद्र जंजाळ आले.

यानंतर जंजाळ आणि केंद्रे चहा घेण्यासाठी गाडीत बसले असता त्यांनी गाडी फालोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौकातील कार्यालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी भुमरे कामात असल्यामुळे केंद्रे कार्यालयाबाहेर आले असता त्याच्या पाठीत कोणीतरी बुक्के मारत शिवीगाळ करून माझ्या कानशिलात लागावल्या आणि मला मारहाण केली. असे प्रा. गोविंद केंद्रे यांनी सांगितले. त्याचबरोबर माझे अपहरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार त्यांनी केली होती.