पदवीधर निवडणुक: भाजपाला लागलं नाराजीचं ग्रहण! आणखी एक मित्रपक्ष दुखावल्याने वाढली डोकेदुखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं.

पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली. पदवीधर निवडणुकीत तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केले.

दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामनेही आता नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा शिवसंग्रामला विचारात घेत नसून पक्षाच्य काही नेत्यांना मराठवाड्याची जागा पाडायची आहे का? असा सवाल विनायक मेटेंनी केला. तसेच याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावं, येत्या २५ तारखेपर्यंत शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशाराही विनायक मेटेंनी दिला आहे. त्यामुळे आधीच बंडखोरी आणि नाराजीचा सामना करणाऱ्या भाजपासमोर आणखी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे.

जयसिंगराव गायकवाडांचा भाजपला रामराम
जयसिंगराव गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपला रामरामही ठोकला. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment