व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? भाजपने पाढाच वाचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील ठाकरे सरकार वर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे ही भाजपची भाषा बोलत असून त्यांनी सरड्या सारखे रंग बदलले आहेत अशी टीका महाविकास आघाडीने केली होती. त्यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपर्यंत घेतलेल्या भूमिकेचा पाढाच वाचत त्यांच्यावर टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हंटल की, रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण शरद पवार यांच काय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली.

पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली. २०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले.

बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपासोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकार वर जोरदार प्रहार केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपविरोधात एकही शब्द टीका केली नाही. उलट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.