धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांनी काल फेसबूक पोस्ट केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे. दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे. याशिवाय, त्यांची दुसरी पत्नी असलेल्या रेणू शर्मा मुंबई पोलिसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार देखील केली आहे”, असं किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय रेणू शर्मा यांच्या मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंयज मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like