Wednesday, June 7, 2023

अजित पवारांकडून जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्रीत मोठा घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक महत्वपूर्ण खुलासे केले जात आहेत. राज्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान सोमय्यांनी आज पुन्हा पवारांवर हल्लाबोल केला. “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आतापर्यंत केलेल्या घोटाळ्यातील सर्वात मोठा घोटाळा जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीत केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीत अजित पवारांनी सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. या कारखान्यातील घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

अजित पवार हे जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव करायला लावला आणि स्वतःच्याच कंपनीला घ्यायला लावला. या कारखान्याचे मालक मोहन पाटील, विजया पाटील आणि निताताई पाटील आहेत. विजया पाटील आणि निताताई पाटील या अजित पवारांच्या बहिणी आहेत. जर बहिणींनी कोणताही घोटाळा केला नसेल, तर बहिणींच्या नावाने अजित पवारांनी बेनामी संपत्ती उभी केली आहे का? असा सवाल सोमय्यांनी केला.