Saturday, January 28, 2023

राज्य सरकारने मराठा तरुणांच्या पाठीत खुपसलेला खंजीर महागात पडेल- चंद्रकांत पाटील

- Advertisement -

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे”, अशी घाणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केली आहे.

“राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे”.

- Advertisement -

“अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतंय”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. “राज्य सरकारने आतातरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला (Chandrakant Patil Slams Maharashtra Government on Maratha Reservation).

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in