रेणू शर्मांने धनंजय मुंडेवरील बलात्काराची तक्रार मागे घेताच भाजपच्या चित्रा वाघ संतप्त; केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनीदेखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी राज्यभर भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आलं होतं. परंतु आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया देत तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

ट्विटरवर एक व्हिडिओ जारी करत चित्रा वाघ म्हणाल्या, “रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केला होता. परंतु आता त्यांनी तो मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडेंवर ज्यावेळी बलात्काराचा आरोप झाला हे आमच्यासाठीही तितकंच धक्कादायक होतं. आज ज्या पद्धतीनं तक्रार मागे घेतली गेली हेदेखील तितकंच धक्कादायक आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून भाजपची भूमिका होती ती स्पष्ट होती. आमच्यासाठी हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नव्हतं. आम्ही चुकीचं उदाहरण महाराष्ट्रापुढे जाऊ देणार नाही ही आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामाही मागितला होता, असंही त्या म्हणाल्या.

“ज्या प्रकारे रेणू शर्मा यांनी हा आरोप मागे घेतला त्यामुळे त्यांच्यावर आयपीचीच्या १९२ अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे. खोटे आरोप करणं आणि गुन्हे दाखल करणं चुकीचं आहे. राजकीय कार्यकर्ता असो किंवा सामान्य व्यक्तीही असो तो उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये खऱ्या पीडिता आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. हे समाजाच्या हिताचं नाही. खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मांवर आयपीसीच्या १९२ अंतर्गत तात्काळ कारवाई करावी. अशी विनंती पोलिसांकडे करत आहे. तपासकार्य सुरू असताना हा गुन्हा मागे घेतला आहे त्यामुळे खोटे आरोप केल्याबद्दलच्या कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी,” असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment