विरोधी पक्षनेते तोडपाणी करतात असं म्हणण्याची सवय त्यांची जुनीचं; फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील शेतकरी आंदोलवरून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी प्रवीण दरेकर यांना प्रत्युत्तर देत त्यांच्या विरोधी पक्षनेता म्हणून त्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात असं बोलण्याची शरद पवार यांची ही सवय जुनी आहे. विरोधी पक्षनेते तोडपाणी करतात असे ते एका विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलले होते, पण तेच नेते आता त्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. तुमच्या कामाचं मूल्यमापन पूर्ण महाराष्ट्र करत आहे. कोणालाही विचारलं तर तो हेच सांगेल. विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीची उंची वाढवणारे काम तुम्ही एका वर्षात केले आहे, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. प्रवीण दरेकर भाषण करताना काहीसे दुखावलेले वाटले. शरद पवार जे बोलले त्यासंदर्भात आपल्याला वाईट वाटलं, पण अशा गोष्टींची काळजी करायची नसते. त्यांनी वडीलधाऱ्यांच्या नात्याने सल्ला दिला असं मानून, आपल्या कामाचा ठसा उमटत आहे असे समजून पुढे जात राहायचे, असा सल्लाही फडणवीस यांनी दरेकरांना दिला.

ज्या वेळेस कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. ज्यावेळी करोनाची साथ आली. त्यावेळी दरेकर क्वारंटाइन सेंटर्स, कोविड सेंटर्स येथे जीवाची पर्वा न करता भेट देऊन तेथील उपाययोजनांतील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि त्या परिस्थितीत करावयाचे बदल, याविषयी माहिती जाणून घेत होते. महापालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करत होते. अतिवृष्टीत लाखो शेतकरी संकटात सापडले होते त्यावेळेस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात दरेकर यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचे पंचनामे असतील, पीक विम्याचे अर्ज असतील, तातडीची मदत असेल, नुकसानीचे पॅकेज असेल, याबाबतीत सरकारला जागे करण्याचे काम दरेकर यांनी केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर यांनी आव्हानात्मक आणि करोना संक्रमणाच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानाच्या वेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं आणि हे आव्हान पेलण्यात दरेकर उजवे ठरलेत, असे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहचला असताना आणि लोक मृत्यमुखी पडत असताना काही जण वेगवेगळे पॅटर्न सांगून आपली पाठ थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात प्रवीण दरेकर यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment