इंदापूर । महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांना संधीसाधू म्हणत टीका केली होती. तांबेंच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
“सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत”, अशा शब्दात शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना असं सडेतोड उत्तर दिलं.“युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती”, असा बोचरा वार अंकिता पाटील यांनी केलाय. “राज्यातील ज्येष्ठ नेत्यावर बोलताना काही सुसंस्कृतपणाचे संकेत असतात ते त्यांनी पाळायला हवे होते. परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. शेवटी मोठ्या नेत्यावर बोललं म्हणजे आपण मोठे होत नसतो तर त्यासाठी काम करावं लागतं”, असा टोलाही अंकिता यांनी तांबेंना लगावला.
नेमकं काय म्हणाले होते सत्यजीत तांबे?
युवक काँग्रेसचा इंदापुरात मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रमुख वक्ता म्हणून संबोधित करताना सत्यजीत तांबे यांनी पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला होता. “इंदापूर तालुक्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे नाव आजही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नेता आदराने घेतो. पुणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पुढच्या पिढ्यांत तो विचार राहिला नाही किंबहुना संधीसाधूपणा आला. खरं तर शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला”, अशी टीका सत्यजीत तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’