भाजपच्या हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक राजकीय नेते विविध पक्षातील असले तरी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नामुळे, नातेसंबंधांमुळे ते एकमेकांचे सोयरीक असतात. अनेकवेळा राजकीय नेते एकमेकांवर टीका करतात. मात्र, त्यांची कौटुंबिक माहिती घेतल्यास विरोधीपक्षातील अमुक अमुक नेत्यांचे त्याचे कौटूंबिक संबंध असतात. असाच दोन वेगवेगळ्या पक्षातील व घराण्यातील राजकीय व्यक्ती एकमेकांचे सोयरे होत आहेत. ते म्हणजे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे होय. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे.

ठाकरे घराण्यातील बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा 28 डिसेंबर रोजी विवाह होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. दरम्यान नुकतीच हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ येथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांना त्यांनी 28 तारखेला होणाऱ्या विवाह सोहळ्याचे निमंत्रणही दिले.

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचे एलएलएमपर्यंत शिक्षण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे. तर अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत.

 

पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणूकीमध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकले. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.