‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच मराठी शाळांबाबत शिवसेनेचा दृष्टीकाेन; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर पत्राद्वारे टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विधान परिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असताना भाजपच्या एका आमदाराने मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या मुद्दयावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. “मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे ठोकण्यात येत असून ‘रोज मरे त्याला कोण रडे?’अशा दृष्टीकोनातून सत्ताधारी मराठी शाळांकडे पाहत आहेत,” अशी टीका भाजप आमदाराने पत्रातून केली आहे.

भाजप आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या मुद्दयावरुन मुख्यमंत्री ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. आमदार साटम यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, ‘सर्वप्रथम आपणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. पण बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे.

खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळं ठोकण्यात येत असून ‘रोज मरे त्याला कोण रडे?’अशा दृष्टीकोनातून सत्ताधारी मराठी शाळांकडे पाहत आहेत. याचा थेट परिणाम मराठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील घसरणीतून समोर येत आहे.

भविष्यात वर्धापन दिन हा स्थापना दिवस साजरा करण्याची वेळ येणार नाही

एकीकडे सत्ताधारी सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्क्यांनी घसरत आहे. तसेच मी आशा करतो की तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल, जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही, असा टोला देखील साटम यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.

Leave a Comment