भोपाळ । परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असा टोला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या पक्षातील लोकांकडे कशाप्रकारे बोलावे याची सभ्यता नाही. तसेच त्यांच्याकडे संस्कार आणि देशभक्तीही नाही. मुळात दोन देशांचे नागरिकत्व असणाऱ्यांच्या अंगात देशभक्ती कुठून येणार? चाणक्याने म्हटले होते की, या भूमीतील सुपुत्रच देशाचे रक्षण करु शकतो. परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले.
त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी साध्वी प्रज्ञा यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, कोणताही देशभक्त दहशतवादी असू शकत नाही. कोणताही देशभक्त गोडसेभक्त असू शकत नाही. याआधी भोपाळमधील कार्यक्रमात बोलताना प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याल जडलेल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला होता. “काँग्रेसचं सरकार असताना नऊ वर्षे तुरूंगात होते. या काळात तुरूंगात छळ करण्यात आला. त्यामुळे मला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्या अजूनही कायम आहेत. अनेक जुन्या व्याधीही आता बळावल्या आहेत. या सगळ्या छळामुळे माझी नजर कमी झाली असून मेंदू व डोळ्यात सूज आली आहे. उजव्या डोळ्याची नजर कमी झाली असून, डाव्या डोळ्यानं बघू शकत नाही,” असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”