हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकवेळा टीका टिप्पणी होते. ठाकरे सरकारवर तर खूपवेळा निशानाही साधला गेला आहे. दरम्यान आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ‘ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
औरंगाबादेत भाजपचा आज ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यास भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुंडे म्हणाल्या की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आधीच अध्यादेश काढला असता तर या निवडणुकीत त्याचा फायदा झाला असता. जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. सरकारला आवाहन आहे की, अध्यादेश टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणूक घेऊन दाखवा, असेही मुंडे म्हणाल्या.
आमचे वडील गोपीनाथ मुंडे म्हणायचे की, ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही. जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केला आहे.