मोदींच्या वाढदिवशी भाजपचा मोठा प्लॅन; 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात कार्यक्रम राबवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस असेल. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून खास कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु आहे. हे कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी भाजपने आपले सरचिटणीस अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय केंद्रीय पॅनेलची स्थापना केली आहे, ज्यामध्ये रक्तदान शिबिरे, जलसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेबाबत जनजागृती कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश असेल.

सिंग यांनी पक्षाच्या राज्य युनिटला लिहिलेल्या पत्रात प्रचाराच्या विविध विषयांवर सूचना दिल्या आहेत. पत्रानुसार, जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते ‘विविधतेत एकता’ महोत्सवाचे आयोजन करून लोकांमध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश देणार आहेत. पक्षाने वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता मोहीम आणि जलसंधारणासाठी जनजागृती मोहीम, दिव्यांग व्यक्तींमध्ये उपकरणे वाटप, स्थानिक उत्पादनांची जाहिरात आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे यासाठीही निर्देश जारी केले आहेत. मोहिमेचा एक भाग म्हणून 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती, भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना खादी आणि स्थानिक उत्पादने वापरण्यास प्रोत्साहित केले जाईल.

गेल्या काही वर्षांपासून भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून पंधरवडाभर साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सर्व नेते, खासदार, आमदार आपापल्या भागात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वृक्षारोपण मोहीम, रक्तदान आदी कार्यक्रमांचे आयोजन करतात. मागील वर्षी मोदींच्या वाढदिवसाला लसीकरणाचा विक्रम करण्यात आला होता. या दिवशी, एका दिवसात सर्वाधिक 2.5 कोटी कोरोना लसीकरण करण्यात आले. यासाठी भाजपने देशभरात गावोगावी जाऊन, गल्ली- गल्लीत पोहोचून लोकांना लसीसाठी प्रेरित केले होते. एवढेच नाही तर यासाठी विशेष शिबिरही आयोजित करण्यात आले होते.