‘ड्रायक्लीनर देवेंद्रजींनी ‘त्या’ सर्वांना क्लीनचीट दिली, पण मला देऊ शकले नाही याच कारण काय?’- एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती. मात्र, आता खडसे यांनी थेट फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला असून, त्यांना ड्रायक्लीनर असं संबोधलं आहे.

“देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. जो आला त्याला क्लीनचीट दिली. आमचा ड्रायक्लिनरच होता. त्याच्यामध्ये असं होतं की, जो कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची. फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत. म्हणजे आमच्या ड्रायक्लीनरकडे पण अशी काय कला होती, इतक्या लोकांना दिली पण मला देऊ शकले नाही. याच कारण काय?, हे विचारण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे मी ते विचारतोय,” असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का?
“पक्षाकडे मी वारंवार हे सांगितलं आहे. ज्यांनी हे केलंय, त्यांच्याकडून याची उत्तर घ्या. ज्यांनी अशा स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप केले. ज्यांनी तिकीट देण्यामध्ये अडथळे निर्माण केले. ज्यांनी तिकीट देऊन हरवण्याचा प्रयत्न केला. याचे सारे पुरावे दिले आहेत. तर सहा महिने झाले निवडणूक होऊन पक्ष त्यावर कार्यवाही का करत नाही. निदान आम्हाला बोलून तरी विचारा. मी पुरावे दिले आहेत. व्हिडीओ कॅसेट दिल्या आहेत. रेकॉर्डिंग दिलं आहे. वर्तमानपत्राची कात्रण दिली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याचं मान्य केलं होतं. मग कारवाई करायला विलंब का होतोय. माझ राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का?, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असं विचारलं पाहिजे. खरं असेल तर करा,” असं खडसे यांनी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment