खडसेंचे आरोप फेटाळण्यासाठी चंद्राकांतदादांनी केलं संघाला समोर, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचं तिकिट का नाकारण्यात आलं यामागचे कारण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. “भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सप्ष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

”इतक्या मोठ्या नेत्यानं पक्षाचे वाभाडे करताना विचार तर करायला हवा’’ असं मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. पक्षानं ८७-८८ पासून नाथाभाऊंना सात वेळा तिकिट दिलं. तसेच त्यांच्या मुलाला तिकिट दिलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिलं गेलं. त्यामुळे  खडसेंवर अन्याय होत नाही असा विचार केंद्रानं बहुतेक केला असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवं अशीच माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानंच त्यांना तिकिट नाकारलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावं जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

इतर निष्ठावंतांना तिकीट दिलं असतं तर समजू शकलो असतो, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होतं ना? असा सवाल करत खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. तसेच हा सर्व प्रकार पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे असं खडसे म्हणाले होते. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment