आतातरी आश्वासनांचा बाजार मांडणं बंद करा; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार हे गांभीर्य नाही.” असे म्हणत “आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं आतातरी बंद करा आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना त्वरित मदत करा,” असे पाटील यांनी म्हंटले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीची फार गरज आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं आतातरी बंद करा आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना त्वरित मदत करा.

एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा आता शेतकरी बांधवांच्या जीवावर बेतत आहे. सत्तेत आल्यापासून राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाळीतच टाकले आहे. आम्ही सतत म्हणतोय शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत करा, मात्र तरीही दुर्लक्षच !

आधीच्याच नुकसानाचे पंचनामे अद्याप अर्धवट आहेत, त्यातच आताच्या संकटाने पुरत्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा आहे, त्यामुळे कुठल्याही पंचनाम्याशिवाय मदत जाहीर करा आणि ती गरजूंपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, असे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत आघाडी सरकारला गांभीर्य नाही

राज्यात महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून सत्तेवर आले आहे. तेव्हापासून या सरकारकडून राज्यातील मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे आजही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामागचे खरे कारण कोणते असेल तर “मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार हे गांभीर्य राहिलेले नसल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.