Sunday, February 5, 2023

उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा; बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले आक्रमक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले संतापले आहेत. बंडातात्या कराडकर यांच्या अटकेनंतर आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा त्यांनी दिला.

आचार्य तुषार भोसले म्हणाले, ठाकरे सरकार हे मुघलांपेक्षाही अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल करत उद्धवजी आणि अजित पवार आता परिणाम भोगायला तयार रहा, असं ते म्हणाले.

- Advertisement -

बंडातात्या कराडकर यांना अटक –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी काढण्यास राज्य सरकारने मनाई केलेली असताना तो आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली असून समर्थकांनी ठिय्या देवून बसलेले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये एसटीमधून प्रवेश देण्यात येणार आहे. सरकारने सामान्य वारकऱ्यांना पायी वारीस मज्जाव केलेला आहे. मात्र, सरकारचा हा आदेश झुगारून बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत दाखल झाले होते. याठिकाणाहून त्यांनी पायी वारीला सुरुवात केली होती. बंडातात्या यांनी सरकारला आवाहन देत सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते.