टीम हॅलो महाराष्ट्र । भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांची मोदी सरकारमध्ये गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची जागा कोण घेणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असलेले भाजपचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आज नव्या हातांमध्ये जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार असून, यासंदर्भातील कार्यक्रम भाजपाने जाहीर केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं वृत्त असून, त्यामुळे आजच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदी जे. पी. नड्डाच का?
विद्यार्थी आंदोलनातून पुढं आलेले नड्डा हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. मूळचे हिमाचल प्रदेशातील असलेल्या नड्डा यांच्याकडं संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनं सपा आणि बसपाच्या आघाडीचा आव्हान परतवून लावत ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात नड्डा यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. भाजपचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संसदीय बोर्डात ते सदस्य देखील होते.