अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही पोटनिडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीनंतर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची अंतर्गत बैठक झाली. यांनतर हि पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे भाजपने जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

याठिकाणी ऋतुजा लटके निवडून याव्यात यासाठी त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आमचा अर्ज मागे घेतो असं बावनकुळे म्हणाले. खरं तर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही अंधेरीची निवडणूक १०० टक्के जिंकणार होतो. पण जेव्हा कधी एखाद्या आमदाराचे निधन होते आणि त्याजागी त्यांच्या पत्नी किंवा मुलगा उभा राहतो तेव्हा उमेदवार द्यायचा नाही ही आपली संस्कृती आहे असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे याना पत्र लिहीत निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.