कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरात आंदोलने विविध पद्धतीने केली जातात. मोर्चे, घेराव, रस्ता रोको, गांधीगिरी या पद्धतीची आंदोलने आता मागे पडत आहेत. जलसमाधी घेण्यासाठी नदीत आणि तळ्यात उतरणे, स्वतःला पेटवून घेणे या प्रकारची आंदोलनेही आता नवीन राहिली नाहीत. या सगळ्या परिस्थितीत गारगोटीत मात्र आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील वैद्यकीय सेवा सुरळीत व्हावी या मागणीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन गारगोटी शहराच्या स्मशानभूमीत करण्यात आले. प्रहार संघटनेच्या वतीने या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला गारगोटीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भुदरगड तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा अकार्यक्षम झाली आहे. भुदरगड तालुक्यातील रुग्णांना शासनाच्या वतीने चांगले उपचार मिळावेत, गारगोटी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांना पुरेसे डॉक्टर, नर्सेस, टेक्निकल स्टाफ द्यावा, मोफत औषधांचा पुरवठा व्हावा या मागणीसाठी गारगोटी शहरातील स्मशानभूमीत रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक काळापासून या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती झाली नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी आणि स्वयंसेवी संघटनांनी बोलून दाखवली. वैद्यकीय प्रशासनाने यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत प्रत्यक्ष काम होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचं प्रहार संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी गर्दी केली होती. या शिबिरास भेट देऊन आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी अनेक गारगोटीकर नागरिकांनी हजेरी लावली.