कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेली दोन वर्ष महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देश हा कोविड 19 या आजाराशी निकराने लढा देत आहे. अशा या महामारीच्या काळामध्ये विविध दवाखान्यांमध्ये अनेक आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत आहे. परंतु सध्या रक्तपेढीमध्ये कमी प्रमाणांत रक्तसाठा उपलब्ध असल्याने रक्त आवश्यक असलेल्या रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून वाढदिवस नियोजन समिती यांचेवतीने दौलतनगर (ता.पाटण) येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
या महारक्तदान शिबीरामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दि. 17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला युवकांनीही साद दिली. महारक्तदान शिबीरामध्ये तब्बल 1111 रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करुन सातारा जिल्हयात प्रथमच एकढया मोठया प्रमाणांत रक्तदात्यांनी रक्तदान केलेने हे महारक्तदान शिबीर यशस्वी झाले.
दौलतनगर येथे श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनिअर व सिनिअर कॉलेज दौलतनगर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10.30 वा. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते या महारक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही केला. या महारक्तदान शिबीरामध्ये महालक्ष्मी रक्तपेढी कराड, बालाजी रक्तपेढी सातारा, अक्षय रक्तपेढी सातारा, यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड, उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी कराड, कृष्णा हॉस्पीटल रक्तपेढी कराड, सिव्हिल हॉस्पीटल रक्तपेढी सातारा, माऊली रक्तपेढी सातारा या आठ रक्तपेढया महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या.
शिबीर यशस्वी करण्यासाठी वाढदिवस नियोजन समितीचे जि.प. सदस्य विजय पवार, प.स.सदस्य संतोष गिरी, शिवशाही सरपंच संघाचे विजय शिंदे, व तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॅा. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. राधाकिसन पवार, डॅा. सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॅा. खराडे, आरोग्य विभाग व महसूल विभागचे अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.